‘ये जिंदगीका रंगमंच है मेरे दोस्त
यहॉं हर किसी को नाटक करना पडता है‘
एक वर्ष संपलं व दुसरं नवीन वर्ष सुरू झालं. या वर्षाअखेर व वर्षाच्या सुरूवातीला आयुष्याबद्दल खूप विचारमंथन होतं, अर्थात प्रत्येकाचं!
‘सोळा साल खराब गेलं राव आता सतरा तरी चांगलं जावं’ असा नाराजीचा सूर माझ्या काही मित्रांनी धरला होता. त्याची अनेक कारणं होती. काहींच्या मागे दवाखाना लागला होता म्हणजे माझ्या एका मित्राची मागील वर्षात तीन ऑपरेशनं झाली. अर्थात ती फार मोठी नव्हती पण तरीही... तर काहींना त्यांच्या संस्थेनं पगार दिला नव्हता. तर काही न्यूट्रल म्हणजे मजेत म्हणता येईल असेच होते. हे झालं आमच्या गरीब मध्यमवर्गीय तरूणांचं! पण एकंदरीत तरूणांचा सूर कसा आहे?
भारत हा सध्याचा जगातला सर्वात तरूण देश आहे, हे सर्वांनी सांगून झालं. तरूणाईबद्दल उलट-सुलट गप्पाही करून झाल्या. पण तरूण त्याकडे लक्ष देतात का? आम्हाला काही पडलेलं नाही कोण काय बोलतंय त्याचं... आम्ही आमच्या पद्धतीनं जगणार... असाच आमचा हेका आहे आणि यात वाईट काय?
आज तरूण सुधारलाय तसाच तो जागरूकही झालाय; पण एकंदरीत लोकांना काय चित्र दिसतंय? मुलं ऐय्याश होतायत, प्रेमप्रकरणं करतायत. याचंच प्रतिबिंब आपल्याला टीव्हीवरही पहायला मिळेल. टीव्हीवर ज्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती दाखवल्या जातायत त्यात ते काय दाखवतायत?
मुलांसाठी स्पेशल क्रीम; ती लावली की ‘हाय हँडसम’ म्हणत मुली जवळ येतायत. पावडर लावली की मुली भुलतायत. डिओ तर मुलींना जवळ बोलवण्याचा जादूचा मंत्रच झालाय. साबन, तेल, शॅम्पू, केसाला लावायचा जेल, गाड्या (बाईक्स), दाढी करायचं ब्लेडसुद्धा. या सगळ्यांमुळं मुली अट्रेक्ट होतात. एवढंच काय विशिष्य कंपनीची अंडरवेअर, बनियन घतली तरी मुली पळत येतात!
अरे काय!!!! आमच्या मुलांना दुसरा धंदा उरला नाय काय? आणि आमच्या मुलींना तुम्ही एवढं मुर्ख समजता? अरे आमची तरूण पिढी प्रगल्भ होतेय... आम्ही जे काही करतोय ते विचार करून करतोय फक्त आम्हाला आमच्यावर विचार लादून घ्यायला आवडत नाही.
मुलांमुलींच्या संबंधांबद्दल बोलायचं झालं तर सध्या ‘सिंगल’ मुलगा किंवा मुलगी मिळणं कठीण झालंय. (आमच्यासारखे काही अपवादपण आहेत!) आमच्यात अट्रेक्शन वाढतंय हे खरं आहे आणि आम्ही ते खुलेपणानं स्वीकारतोय. मुलामुलींना जीवनात एकटेपण नकोय. त्यांना कुणाचातरी सहवास हवाय. त्यांना सगळ्या भावना अनुभवायच्या, जोपासायच्या आहेत. मुलीसुद्धा आता खुलेपणानं विचार करून निर्णय घेतायत. पण याचा अर्थ सगळंच वाया गेलंय असा नाही ना?
आम्हाला मित्रांच्यात रमायला आवडतं. आजच्या तरूणाईला आयुष्य जगायला आवडतं. आधीच्या पिढीची ‘कम्फर्ट झोन’ लाईफ आम्हाला नकोय. आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणं जगता आलं पाहिजे बस्स! कम्फर्ट झोनमध्ये अडकून आयुष्य वाया घालवायला आम्ही तयार नाही आहोत. त्यामुळेच आताची तरूणाई नवीन पर्याय शोधतेय. एका कंपनीमधून दुसर्या कंपनीत जाणं, यात आम्हाला काहीच विशेष वाटत नाही. किंबहुना फिल्ड, प्रोफेशन बदलायलाही आम्हाला जास्त त्रास होत नाही.
मध्यंतरी ‘तमाशा’ नावाचा खूप चांगला सिनेमा येऊन गेला. त्यात तो नायक आपल्या लोकांपासून दूर जाऊन बिंधास्त जगायचा प्रयत्न करतो. तिथं त्याला कोणी ओळखत नाही. त्याच्यातली एक दबलेली गोष्ट तिथे जाऊन बाहेर पडते; पण जेव्हा तो परत येतो तेव्हा पुन्हा कुळवाच्या बैलासारखं जुंपला जातो. तरूणाईची मनस्थिती अशी थोडीशी वेगळी झालीच आहे. आम्हाला आमच्या ईच्छेप्रमाणेच सर्व करायचंय. आमच्या पद्धतीनं आयुष्य जगायचंय. यासाठी बर्याच गोष्टी फाट्यावर मारायला कुणी मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे पार्ट्या, भटकंती अशा अनेक मार्गांचा वापर होतोय.
सोशल मीडिया ही आमची ताकद आहे. आम्हाला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करायला आवडतो. वेगवेगळे छंद जोपासले जाताययत. याचा अर्थ सगळं वातावरण बिघडलेलं आहे असा थोडाच होतो. उद्योजगता या विषयावर होणार्या सेमिनार्समध्ये पाहिलं तर तरूणांचं प्रमाण अधिक आहे. याचा आम्ही पारंपरिक विचारसरणी सोडू पाहतोय. नवीन काहीतरी करू पाहतोय.
‘कई चेहरे है इस दिल के, नजाने कौनसा मेरा’ तसं अनेक गोष्टी मनात घेऊन आम्ही जगाला तोंड देतोय. आमजी क्षितिजं मोठी आहेत.
थर्टी फर्स्टच्या पार्ट्या जोरात झाल्या. त्यात बर्याच गोष्टी झाल्या असतील; पण तरूणाईला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचाय. आयुष्यात कोणतीच इच्छा अपुरी रहायला नको. प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती पाहिजे. ज्यांना हे करायला जमलं नाही ते सज्जन बनून राहिले. तुम्ही सगळ्यांनाच दोष देऊ शकत नाही किंवा सगळ्याच गोष्टींचं समर्थनही करू शकत नाही.
माझा मामेभाऊ आहे. मामांच्या निधनानंतर कमी वयात त्यानं त्यांचा व्यवसाय सांभाळायला घेतला आणि आता सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आमची जबाबदारी ओळखतोय. आम्ही व्यवसायिक दृष्टिकोन घेऊन पुढं जातोय. कारण आमची स्पर्धा जगाशी आहे. देशाबद्दल आम्हाला आजिबात विचार नाही असं थोडीच आहे.
मोठमोठ्या पदांवर जाणारी तरूणाई, समाजकार्यात पुढाकार घेणारी तरूणाई, राजकारणात ठसा उमटवू पाहणारी तरूणाई, जागरूक तरूणाई, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये झळकणारी तरूणाई या सगळ्यांकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? खरंच खूप विदारक चित्र आहे का?
या जिंदगीच्या रंगमंचावर आजची तरूणाई दमदारपणे आपली भूमिका साकारतेय. त्यांची स्क्रीप्ट तेच लिहितायत. त्यात रंग तेच भरतायत आणि उभं करतायत एक उज्ज्वल भवितव्य असणारं ‘नाटक’.
- तुषार उथळे पाटील
9552828100
No comments:
Post a Comment