क्यूं पैसा पैसा करती है, क्यूं पैसे पे तू मरती है
इक बात मुझे बतलादे तू उस रब से क्यूं नही डरती है
अक्षय कुमारच्या ‘दे दणा दण’ या सिनेमतील हे गाणं आहे. सारखा पैसा मागणार्या आपल्या प्रेयसीसाठी तो हे गाणं म्हणतो; पण सध्या या दोन ओळी समाजातील बर्याच लोकांसाठी म्हणाव्याशा वाटतात.
कोण म्हणतं सध्या कलयुग चालू आहे. सध्या चालू आहे ते फक्त ‘धनयुग’! पैसा... पैसा... आणि फक्त पैसा! ‘अपना सपना... मनी... मनी... मनी...’ असं म्हणत सगळे फक्त पैशाच्या मागे धावतायेत. आज जगात सर्वश्रेष्ठ जर कुठली गोष्ट असेल तर तो फक्त पैसा आहे. ‘ना बिवी ना बच्चा ना बाप बडा ना मैय्या... द व्होल थिंग इज दॅट की भैय्या सबसे बडा रूपय्या..’ अशी सध्याची परिस्थिती आहे.
पैशासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. अगदी आपल्या स्वकियांचे प्राण घ्यायलाही, बापाला घराबाहेर काढायलाही लोक कचरत नाहीयेत. कारण पैसा हा सध्या प्रतिष्ठेचा, ‘स्टेटस’चा विषय आहे! पैशाशिवाय सध्या पानही (कागदही, प्रेयसीही, अधिकारीही, कामगारही) हलत नाही... मग हा पैसा आपल्याकडे नको? सध्याच्या या धनयुगात धन म्हणजे पैसा असेल तर तुम्ही काय करू शकत नाही? सगळं करू शकता... एव्हरीथिंग...
ज्याच्याकडे पैसा नाही तो माणूस या जगात फक्त किड्यामुंग्यांसारखा एक तुच्छ जीव आहे. त्याला काहीही किंमत नाही. तो फक्त हेटाळणीसाठी जगत असतो. मरण येत नाही म्हणून जगत असतो. खरं तर त्याला जगण्याचा अधिकारच नाहीये; तरीही तो जगत असतो. का जगतात ही भिकारडी लोकं? अशीच श्रीमंतांची धारणा असते.
काही लोक म्हणतात, ‘मला पैशाची काही हौस नाही. मी पैशासाठी काम करत नाही. मला जेवढं मिळतंय तेवढ्यात मी समाधानी आहे.’ मात्र यात तथ्य नसतं. यांनीही प्रयत्न केलेले असतात पण जास्त पैसे मिळवता येत नाही म्हणून ते या उपदेशापर्यंत पोहोचतात. थोडक्यात ‘संधी अभावी साधू.’ शेवटी काय पैसा... पैसा... आणि फक्त पैसा...
मी एका ठिकाणी वाचलं होतं की ‘पैसा हे साध्य नाही तर साधन आहे’. म्हणजे काय? तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पैसा हा तुम्हाला मदत करेल पण कुठं पोहचायचंय हे तुम्हालाच ठरवायला हवं. फक्त पैसाच कमवायचाय हे जीवनध्येय कधीच होऊ शकत नाही; पण सध्या परिस्थिती तीच आहे. आताच्या पिढ्या या बालपणातून निघाल्यापासून मरेपर्यंत फक्त पैशासाठी धावतायत.
माझे खूप मित्र असं म्हणतात, ‘मला खूप म्हणजे प्रचंड पैसा कमवायचाय...’ पण एवढा पैसा कमावून करणार काय हेच त्यांना माहिती नसतं. हे त्यांचं मत निर्माण होतं आकर्षणातून! चित्रपटामध्ये किंवा आजुबाजूला बघितलेल्या शानशौकीतून... आम्ही बघितलेलं असतं की भोवताली काही लोक खूप पैसा खर्च करतायत आणि आम्हाला शंभर-दोनशे रूपयांसाठी मारामार करावी लागतेय. त्यांना जर ‘का?’ असं विचारलं तर तीच टिपिकल उत्तरं येतात. ‘बीएमडब्ल्यू/स्कोडा/ऑडी/लँडरोव्हर गाडी घेणार... एक मोठा बंगला बांधणार... गावात सगळ्यात मोठा बंगला आपला पाहिजे... मग त्यात हे हवं ते हवं... इथं एक घर... तिथं एक घर... असं लाईफस्टाईल... तसं लाईफस्टाईल... ह्या कंपनीचं घड्याळ... त्या कंपनीचा मोबाईल... ह्या-त्या देशात फिरायला जायचं...’ याच्यापुढं विचार जातच नाहीत.
यामुळं आजची पिढी भरकटत चाललीय. बरीच मुलं कमी कष्टात आणि कमी वेळेत पैसा मिळवण्याचा अट्टाहास करतायत. त्यामुळं एक तर ती फसतात किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पैसा हा का कमवायचा याच्या संकल्पनाच चुकीच्या आहेत. राष्ट्र, समाज या गोेष्टींना कधीच तिलांजली मिळालीय. या जगात कुणी कुणाचं नाही. खरा आहे तो फक्त पैसा. हा आत्ताचा मूलमंत्र आहे.
स्वत:च्या गरजेपेक्षा जास्त पैसा कमवायचा आणि तो दाखवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. असं म्हणतात मुलींना कधी वय आणि मुलांना कधी पगार विचारू नये. याचं कारण हेच आहे. मुलं आपला पगार नेहमी जास्तच सांगणार. कारण कमी पगाराची त्यांना लाज वाटते, गरिबीची त्यांना लाज वाटते.
ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे तो अधिक येत राहतो आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्या हातातून नेहमीच निसटत राहतो. पण असं का होतं याचं उत्तर कोणीच शोधत नाही. फक्त रडत किंवा पळत रहायचं! जगातील 96 टक्के पैसा हा 4 टक्के लोकांकडे आहे. बाकीचे फक्त धावतायत. मध्यमवर्गीय समाज हा अर्थतज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकींनी सांगितलेल्या ‘रेट रेस’ म्हणजे उंदराच्या दौडीत अडकलाय. पैशासाठी तो आपला प्रत्येक दिवस पळण्यात घालवतोय. गझलकार नितिन देशमुख यांची सुंदर गझल आहे,
जळणार्याला विस्तव कळतो, बघणार्याला नाही
जगणार्याला जीवन कळते, पळणार्याला नाही
मग जीवन जगण्यासाठी काय लागतं? पैसा लागतोच. मी नाही कुठे म्हणतोय. पण फक्त पैशानच सारं काही मिळतं असं थोडंच आहे. आईच्या कुशीत, बायकोच्या प्रेमळ मिठीत, मित्रांच्या सहवासात मिळणारं समाधान, आनंद याची तुलना तुम्ही पैशाशी कशी करू शकता? तुमचं एक हास्य पुढच्याला आनंदी करत असेल तर तिथं दुसरं काय हवं?
पैसा किती कमवावा याचं काही प्रमाण आहे की नाही? तुमच्या गरजा किती असतात, किती असाव्यात? तुम्ही कितीही चांगली जीवनपद्धती अवलंबिली तरी त्यासाठी किती खर्च होऊ शकतो? मग उरलेला पैसा काय कामाचा? कोणतीही गोष्ट अति झाली की ती विष होते असं म्हणतात. पण सध्या माणसाला किती खावं याचं प्रमाणच राहिलं नाही. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली तरी एखादा खातोय आणि दुसरीकडे एखादा उपाशी मरतोय... काय म्हणावं याला?
आपली गरज हजारात असताना लाखो किंवा आपली गरज लाखोत असताना करोडो कमावून आणि तो साठवून ठेवून लोक काय करतात? हे मला अजून न उलगडलेलं कोडं आहे. ‘त्यानं पुढच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमावलाय’ अशी वाक्यं आपण नेहमी ऐकतो. मग एवढ्या पिढ्यांना निष्क्रिय बनवून काय साध्य होत असेल? आणि जर तुमची एखादी पिढी कमी करून तुम्ही दुसर्याची एखादी पिढी वर आणली तर काय होईल?
माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो, ‘तुषार, जगात पैशाशिवाय काही नाही. पैसा फेको तमाशा देखो. जोपर्यंत गावात तू मोठी गाडी घेऊन जात नाहीस तोपर्यंत गावातले लोक तुझ्याकडे आदरानं बघत नाहीत...’ असं बरंच काही. पण मला नाही तसं वाटत. अर्थात हे माझं मत. तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि तुम्ही शेजार्याला अडचणीत मदत करत नसाल तर तुम्हाला मान कसा मिळेल? आणि जो मिळेल तो खरा असेल का? जसे गुळाला पाहून चिकटणारे मुंगळे असतात तसे पैसा पाहून जवळ येणारे काही स्वार्थी लोकसुद्धा असतात. ज्याच्याकडे पैसा आहे तो दादा, भाऊ, साहेब असणारच. सध्याचे नेते तरी काय या पैशातूनच जन्माला येतात.
या पैशासाठी माणूस अगदी हीन पातळीवर जायला तयार झालाय. या पैशानं माझ्या समाजाचं काय केलं? तर सगळं गटार, चिखल करून टाकलंय... या घाणीत मग काय निपजणार? पैशासाठी दुसर्याला लुबाडणारी, फसवणारी, हत्या करणारी... एवढंच काय स्वत:च्या बायकोला, मुलीला देहविक्री करायला लावणारी कीड या घाणीत वळवळतेय... त्यामुळे आपला समाज, आपली संस्कृती पोकळ होत चाललीय.
हे कुठेतरी थांबायला हवं. ओंजळ भरून वाहण्याच्या आधी ती वाटायला शिकायला हवं. तुमचं पोट फुटायच्या आधी तुम्ही दुसर्याचा पोटाचा थोडातरी विचार करायला हवा. ‘काहीतरी मिळण्यासाठी आधी द्यायला शिका’ हा ‘युनिव्हर्सल’ नियम आहे.
- तुषार उथळे पाटील
९५५२८५८१००
No comments:
Post a Comment