‘जानू, आज रोज डे आहे.‘ दे गुलाब ती गुलाबी होईपर्यंत!
‘जानू, आज प्रपोज डे आहे.‘ कर प्रपोज तिला वीट येईपर्यंत!
‘जानू, आज चॉकलेट डे आहे.‘ दे चॉकलेट तिचे दात किडेपर्यंत!
‘जानू, आज टेडी डे आहे.‘ दे बाहुली तुझ्या बाहुलीला आणि होऊ दे तुझंही खेळणं एकदा!
‘जानू, आज प्रॉमिस डे आहे.‘ दे तिला वचनं भरभरून. त्याला काय भाडं लागतं का?
‘जानू, आज किस डे आहे.‘ घे चुंबन तिचं करून टाक लालेलाल!
‘जानू, आज हग डे आहे.‘ घे मिठीत तिला तिची हाडं खिळखिळी होईपर्यंत!
आणि शेवटी
व्हॅलेंटाईन डे. आता काय? कर काय करायचं ते!
हुश्श!!! प्रेमाचा सप्ताह. केवढं रे बाबा हे! आणि यात मुलंच नाही तर मुलीही तेवढ्यात आघाडीवर असतात. प्रेमवीरांना तर उसंतच नाही या आठवड्यात. किती खरेदी करायची. वेगवेगळ्या कलरचे गुलाब, ग्रीटींग्ज, टेडीज, देश-विदेशातले, वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स, नवीन कपडे, मेक-अप वगैरे वगैरे वगैरे. आठवडाभर या जगात नसणारच आम्ही. पण खरंच या सगळ्याची गरज असते का?
मला कुणीतरी म्हणालं, ‘तुला गर्लफ्रेंड नाही म्हणून असं म्हणतोय.’ अरे अंधानुकरण करणार्या माझ्या पुरोगामी, फॉरवर्ड मित्रांनो प्रेयसीला जवळ घ्यायला, तिला मिठीत घ्यायला, तिचं चुंबन घ्यायला, प्रेम व्यक्त करायला मला कुठल्या विशिष्ट दिवसाची गरज आहे का? अहो आमच्या (पुण्यातील) झेडब्रीजवर तर रोजच किसडे साजरा होतो!
या सगळ्याची गरज पडते जेव्हा तुमच्यात विश्वास नसतो तेव्हा. प्रेम हे विश्वासाच्या पायावर उभं असावं लागतं. जेव्हा एकमेकांवर विश्वास नसतो तेव्हा अशा कारणांची मदत घ्यावी लागते किंवा मग तुमचा फक्त टाईमपास चाललेला असतो. मग असे सण साजरे करावेच लागतील. त्याशिवाय मनोरंजन कसे होणार? ‘चान्स’ कसा मिळणार?
या सर्व प्रेमवीरांना माझी विनंती आहे की फक्त एकदा इंटरनेटवर ‘व्हॅलेंटाईन डे’ असा सर्च मारा. मग बघा हे अंतरजाल तुम्हाला काय काय सांगतं ते. रोममधील संताने सुरू केलेली ही परंपरा. जगभर तिचा विस्तार व चुकीचा प्रचार, प्रसार होत गेला.
सध्या सगळीकडे निवडणुकीचा माहोल आहे. पण आमच्या प्रेमवीरांचा राजकारणाशी काय संबंध? आम्ही आमच्या विश्वात मश्गुल आहोत. तरीही तुझी ती पार्टी आणि माझी ही पार्टी म्हणून ब्रेकअप घेणारीही जोडपी आहेतच की. अशा ‘डें’चा आधार घेणार्यांना वेगळं व्हायला काय कोणतंही कारण पुरेल.
मित्रांनो प्रेम ही चिरंतन, निर्मळ भावना आहे. त्यासाठी काही ‘नाटकं’ करायची गरज लागत नाही. आता या सगळ्यांचा एक ‘रोग डे’ साजरा करावा लागेल. सोडा सगळं आणि खरं प्रेम करा.
एक सांगेन प्रेम हे व्यक्त करावं लागतंच आणि फक्त बोलून चालत नाही तर ते दाखवावंही लागतं पण त्यासाठी कुठल्याही ‘डे’ची कुबडी घ्यावी लागत नाही. थोडासा विश्वास पेरलात तरी पुरेसा आहे.
(‘व्हेलेंटाईन डे’च्या निमित्ताने साप्ताहिक ‘चपराक’मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख...)
- तुषार उथळे पाटील
९५५२८५८१००
No comments:
Post a Comment