Monday, May 8, 2017

तुझं आहे तुजपाशी


‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ अशी तुकोबारायांच्या अभंगातील एक ओळ आहे. संतश्रेष्ठांच्या अभंगांचे अर्थ काढायला गेले तर त्यांच्या प्रत्येक अभंगावर एक पुस्तक तयार होईल. पण आपण जर फक्त या एका ओळीचा विचार केला तर यातून तुम्हाला पाहिजे तसा अर्थ तुम्ही काढू शकाल.
तुझे आहे तुज पाशी! अशा कित्येक गोष्टी, बहुतेक गोष्टी या आपल्यापाशीच असतात. आपल्यापाशी म्हणजे काय तर आपल्या जवळ, आपल्या आसपास किंवा आपल्या अंतरंगात असतात. मात्र आपण त्या बाहेर शोधत बसतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास, धाडस, सकारात्मकता या गोष्टी आपल्याला उसण्या नाही आणता येत. त्या आपल्यातच असतात फक्त त्या जागृत कराव्या लागतात.
आपल्याला सवयच लागलेली आहे की एखादी गोष्ट जमली नाही किंवा मिळाली नाही तर वेगवेगळी कारणं देऊन आपण बाजूला व्हायचं. तोडता येत नाहीत म्हणून ‘द्राक्षेच आंबट आहेत’ असं म्हणणार्‍या कोल्ह्यासारखं! जे काही झालं त्यात माझा काही दोष नव्हताच हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करायचा. मी योग्य होतो पण परिस्थितीने दगा दिला असं भासवत रहायचं. आपण कमी पडलो किंवा आपले प्रयत्न कमी पडले हे कोणी मान्यच करत नाही.
नशीब ही अशीच एक खूप छान कल्पना आहे. म्हणजे काहीही झालं नाही तर सरळ नशिबावर ढकलून द्यायचं बस्स! माझ्या नशिबात ते नव्हतं, असं म्हटलं की सर्व माफ! एखादा अभ्यास न करणारा विद्यार्थी जर, पास होणं माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणत असेल तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे अभ्यास करणं, प्रयत्न करणं, त्यासाठी कष्ट घेणं ही गोष्ट त्याच्या हातात होती. मात्र नशिब नावाचा जॅकपॉट हातात असताना दोष आपल्यावर का घ्यायचा, नाही का?
‘जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा कारणं द्यायची गरज नसते आणि जेव्हा तुम्ही हारता तेव्हा कारणं द्यायचा काही फायदा नसतो’, असं काहीसं ऍडॉल्फ हिटलरचं एक छान वाक्य आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हारता त्यावेळी तुम्ही कितीही आणि काहीही कारणं दिली तरी तो निकाल बदलणार नसतो. तेव्हा स्वत:च्या चुका मान्य करून पुन्हा उभं राहण्यात खरी मजा असते.
‘पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे’, असंही वाचलं होतं. पण या विचारांचा लोक गंभीरपणे विचार करतात का? माझा एक मित्र आहे. तो ‘मोटिव्हेशन’चे सेमीनार घ्यायचा. नोकरी सोडून त्याने जिद्दीने हे सेमीनार घ्यायला सुरूवात केली होती; पण काही दिवसांनंतर ज्यावेळी मला तो भेटला त्यावेळी तो स्वत: खूप ‘डिमोटिव्हेट’ झाला होता. त्याने पुन्हा नोकरी पत्करली होती. सलग काही सेमीनार अयशस्वी झाल्यामुळे, त्यांचे आर्थिक गणित जुळवता न आल्यामुळे त्याने कच खाल्ली. त्याच्याकडे पात्रता होती पण त्यासाठी लागणारे धाडस तो गमावून बसला होता.
आपल्यातील बहुतेकांची अवस्था ही शक्तींचं विस्मरण झालेल्या हनुमानासारखी झालेली असते. अचाट शक्ती असूनही त्याचं विस्मरण झाल्यामुळे तो काही करू शकत नसतो. त्याप्रमाणेच आपल्यात अनेक गुण असतात पण आपण त्यांना वावच देत नाही. बरेच लोक संधी येईल याची वाट बघण्यात आयुष्य घालवतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, ‘‘वाट पाहणार्‍यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.’’
आपल्या देशात काय नाही? आपल्या देशाएवढी समृद्धता, बुद्धिमत्ता असलेला दुसरा देश अपवादात्मकच असेल. पण तरीही आपण महासत्ता होण्यापासून खूप दूर आहोत कारण आपल्या देशातील बुद्धिमत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्याला जमत नाहिये आणि याचा फायदा दुसरे देश घेतायत. आम्हाला जर काही जमत असेल तर ते फक्त राजकारण आणि त्यातून भ्रष्टाचार हेच! स्वत: रस्त्यावर कचरा फेकणार्‍यांनी देशाच्या स्वच्छतेबद्दल गप्पा काय माराव्यात आणि स्वत:चं घर नीट न सांभाळणार्‍याने देशाच्या व्यवस्थेबद्दल काय बोलावं? सगळंच धन्य आहे!
इथं माझ्या आणखी एका मित्राचं उदाहरण सांगावंसं वाटतं. नोकरीतील अस्थिरता आणि पैसे मिळत नसल्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. खूप मोठी स्वप्नं बाळगणारा तो ‘डिप्रेशन’मध्ये जाण्याच्या मार्गावर होता. खूप नकारात्मक वातावरण तो आपल्या भोवती तयार करू लागला होता. त्याच्याशी सारख्या केलेल्या गप्पा व त्याला तो कसा आहे हे सारखं आठवण करून दिल्यामुळं तो विचार करत राहिला. त्याला काहीतरी व्यवसाय करायचा होता पण काय करावा? कसा करावा? हे त्याला कळत नव्हतं. तो सारखा म्हणायचा की ‘एक पर्याय हवाय?’ पण असे कितीतरी पर्याय त्याच्या आसपासच होते हे त्याला खूप उशीरा कळलं. तो नकारात्मकतेतून बाहेर पडून सकारात्मकतेकडे वळला आणि एक दिवशी त्याचा फोन आला की, ‘मला एक खूप चांगला व सोपा व्यवसायाचा पर्याय सापडला आहे. आपण खूप वेळा त्याच्यावर चर्चा केली पण गंभीरपणे त्याच्यावर विचारच केला नाही.’  तो ज्या पर्यायांवर बोलायचा त्यापैकीच एक व्यवसाय त्याला ‘क्लिक’ झाला आणि त्याचे त्याने नियोजन केले. आता त्याचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू आहे. 
‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जर आपण आपल्या भोवती सकारात्मक वलय तयार केले तर कोणतीच अडचण, समस्या उद्भवत नाही. ती सकारात्मकता त्यातून तुम्हाला बाहेर काढते याउलट जर तुम्ही नकारात्मक विचारात गुरफटत राहिलात तर ती समस्या जास्तच वाढत जाते. कुणीतरी ‘यू कॅन डू इट’ म्हणणारं असलं की जरा जोर जास्त लागतो.
आज सगळे लोक कशाच्या मागे धावतायत. तर पैशाच्या! पैसा मिळवणं खूप अवघड आहे का? तर मुळीच नाही. तुमच्याकडील साधनांद्वारे, तुम्हाला मिळणार्‍या पैशाला कामाला लावून तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. इथंही तुम्हाला स्वत:ला बदलावं लागतं, स्वत:चे विचार बदलावे लागतात, बस्स! ‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ती तुमची चुक आहे’, असे एक विचारवंत म्हणतात. पण देवानं दिलेलं डोकं वापरायचंच नाही असंच आम्ही ठरवलंय! आणि फक्त रडायचं!
तुम्हाला जर काही बदल हवा असेल तर प्रथम स्वत:त बदल करायला हवा. हा साधा नियम आहे; पण आम्ही जग बदलायला निघतो स्वत:कडे लक्ष न देता. काय करणार? ‘परी तू जागा चुकलासी!’ साधच उदाहरण घ्यायचं झालं तर लग्न झालेली मुलगा किंवा मुलगी जोडीदारात आपल्या स्वप्नातील ‘तो/ती’ शोधण्याचा प्रयत्न करतात पण स्वत: तसे होण्याचा अजिबात विचार करत नाहीत. का? माहीत नाही.
मला वाटतं असंच आपल्या आयुष्याची जागा चुकण्याआधी आपण स्वत:मध्ये शोधुया. नक्की काहीतरी सापडेल जे तुमचं तुमच्यापुरतं तरी जग बदलून टाकेल.

- तुषार उथळे पाटील
9552858100

Monday, April 17, 2017

राज, सत्ता, अर्थ आणि त्याचं ‘कारण’



‘हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे...’ हे राष्ट्रभक्तीपर गीत लिहिताना काय भावना असतील सेनापती बापटांच्या मनात? ते सेनापती बापट, ज्यांनी आपली जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती दाखवत स्वत:ला झोकून दिलं स्वातंत्र्यलढ्यात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत! आज आपण आपल्या या पूर्वजांचे आदर्श घेतोय का? अरे आपली लायकी तरी आहे का यांचे स्मरण करायची? संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले सर्व मतभेद विसरून ज्यांनी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्या आचार्य अत्रेंच्या महाराष्ट्रात आज काय चाललंय?
याच कवितेत सेनापती बापट म्हणतात,
हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला
रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे ॥

काय अर्थ उरलाय आपल्या देशातल्या राजकारणाला, समाजकारणाला? राजकारणाचा आणि समाजकारणाचा काही संबंध तरी उरलाय का? ‘लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत केलेले राज्य म्हणजे लोकशाही’ ही व्याख्या कोणत्या काळातली आहे? का कुण्या थापा मारणार्‍या माणसानं केलेलं हे आभाळ आहे? आणि आम्ही मुर्खासारखं ते शिकलोय.
आमच्या पूर्वजांची एक अख्खी पिढी अशी जन्मली होती जी फक्त देशाचा विचार करत होती; पण आता त्यांचा आणि आमचा काही संबंध नव्हताच असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. कोण विचार करतो देशाचा? अरे देश म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे काय? त्याचा आणि आमचा संबंध काय? राजकारण्यांचा, नेत्यांचा आणि सामान्य जनतेचा संबंधच संपलाय. लोकांमधून नेता तयार व्हायचे दिवस गेले. आता नेता तयार होतो घराणेशाहीतून, गुंडागर्दीतून किंवा प्रचंड श्रीमंतीतून!
निवडणुका आल्या की हे सगळे नेते, मंत्री, पक्षश्रेष्ठी कुठून उगवतात कोण जाणे? मग कोण कुणाचा हात धरेल आणि कोण कुणाला लाथ मारेल सांगता यायचं नाही. मग एकमेकांवर अगदी खालच्या थराला जाऊन टीका करायची, शिव्या शाप द्यायचे, ‘पाणी पाजू’, ‘पानिपत करू’, ‘कात्रजचा घाट दाखवू’ असं काहीतरी बरळायचं! निवडणुका झाल्या की एकमेकांच्या गां... (बीप... बीप...) शिरायचं आणि खुर्चीवर बसायचं! नंतर मग कुठला देश, कुठलं राज्य, कुठली जनता आणि कुठले मतदार!
सामान्य नागरिक, कार्यकर्ता आणि नेता या कोणत्या संकल्पना आहेत? आता ‘मत’ हे फक्त एक ‘प्रॉडक्ट’ - विक्रीचा माल आहे. निवडणूक म्हणजेच हंगामी बाजार भरला की व्यापारी येतात, त्यांचे दलाल मालधारकाकडे बोली लावतात आणि तो मालधारक, विक्रेता बोली पाहून आपलं ‘प्रॉडक्ट’ विकतो! झाला व्यवहार पूर्ण! तो व्यापारी त्या मालावर पुढे आपला कारखाना उभा करतो आणि पैसेच पैसे कमावतो.
सत्ताकारण, अर्थकारण ही कारणं पुढं आल्यामुळं राजकारणातून समाजकारण नष्ट झालंय. आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं होतं हेच आता कळायला मार्ग नाही. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही आपल्या निवडणुका या रस्ते, वीज, पाणी, रोजगार, विकास या मुलभूत गोष्टींवरच लढवल्या जातायत! यात काही चुकीचं वाटत नाही का? मग आत्तापर्यंत आपण काय केलं? आपल्या देशातील लोक दुसर्‍या देशात पर्यटनासाठी जातात आणि तिथल्या प्रगतीचे कौतुक करत बसतात. असं कुणाला वाटतं का की अमेरिका, जपान किंवा तत्सम प्रगत देशात असणारे उड्डाणपूल, मोठे चांगले रस्ते, अत्याधुनिक रेल्वे, संसाधने हे सर्व आपोआप होतं किंवा खरंच त्यांच्याकडं एखादा अल्लादीन आहे जो हुकुम देताच एका चुटकीसरशी हे सर्व तयार करतो किंवा निसर्गानेच त्यांना हे ‘प्रिमेड’ दिलेलं आहे! आणि फक्त आपल्यालाच या सगळ्यासाठी झगडावं लागतंय. मी ऐकलंय पुण्यात एक चांगला, टिकावू रस्ता बनवणार्‍या कंपनीला पुन्हा कधी कॉन्ट्रेक्टच मिळालं नाही! असं आहे सगळं गणित!
देव, देश आणि धर्मासाठी आजही आपल्या देशात लढे होतात; मी नाही कुठे म्हणतोय. परंतु त्या सर्वाची बीजं कुणाच्या तरी स्वार्थात असतात. काही लोकांचा त्यातून स्वार्थ साधला जातो बस्स! मग संपतं सगळं! हे पहिल्यापासून असंच आहे असं काही नाही... राजेशाही असताना बरेच राजे प्रजाहितदक्ष होते. रावण हा रामापेक्षा जास्त कुशल, प्रजाहितदक्ष होता असं म्हणतात; त्यामुळे त्याच्या राज्याला ‘सोन्याची लंका’ म्हटलं जायचं.
स्वातंत्र्यानंतरही बरेच नेते खर्‍या अर्थाने ‘लोकनेते’ होते. त्यांची सामान्य जनतेशी, त्यांच्या समस्यांशी नाळ जोडली गेली होती. ते त्यासाठी झटायचे आणि असे नेते प्रत्येक पक्षात, प्रत्येक विचारधारेत होते. आता आपला पक्ष मोठा करण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे विरोधी पक्ष दुबळा करणे! आत्तापर्यंत कॉंग्रेसनं तेच केलं आणि आता भाजपा तेच करते आहे.
मत विकत घेऊन निवडून येणारा नेता कशाला लोकांना विचारेल? त्याला त्याचा ‘कॅटलॉग’ भरून काढायला नको? मत विकणारा तरी कोणत्या तोंडानं काय विचारणार? जाऊ द्या! आपली माडी, आपली गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी यातच सगळं विश्‍व आहे हो! आणि अशा लोकांसाठी नेता तरी काय करणार? तो म्हणतो मरू दे साला, आपण आपलं बघू!
आमची तरूण पिढी प्रेमामध्ये ‘सैराट’ झालीय. सिनेमाच्या मोहमयी दुनियेत वाहत चालली आहे. देश, राष्ट्र हे कशाबरोबर खातात हे आम्हाला माहीतच नाहीये! सगळेच असे आहेत असं नाही. काही तडफदार तरूण गावाच्या, आपल्या भागाच्या आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी पुढे येतात, काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि परत प्रस्थापित धेंडांकडून दाबले जाऊन एकतर या ‘सिस्टम’चा एक भाग होतात किंवा नाद सोडून देतात!
आता यावर किती आणि काय काय बोलणार. केशवसुतांच्या शब्दात मांडायचं झालं तर,
‘प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समतेचा ध्वज उंच धरा रे
नीतीची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुराबरोबर’

असं आता कुणाला म्हणावं तेच कळत नाहीये....!
- तुषार उथळे पाटील


याला राजकारण ऐसे नाव...



आपल्या देशात तीन विषयांना कधीच मरण नाही असं म्हणतात. हे तीन विषय निघाले की गावाचा पार असो, कॉलेजचा कट्टा असो, ऑफिस असो वा प्रवास असो... या तीन विषयांवर तुफान चर्चा होते. मग त्यातील काही माहिती असो वा नसो... ते तीन विषय म्हणजे सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण...
सिनेमा व क्रिकेट मधील दोन-चार नावं जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सहज या चर्चेत सहभागी होऊ शकता! आणि राजकारण... राजकारण तर आपल्या अगदी जवळचा विषय आहे. अगदी घरात, ऑफिसमध्ये, आपण सभासद असलेल्या एखाद्या संस्थेत सगळीकडे आपल्याला आजकाल हे राजकारण अनुभवायला मिळतं. राजकारण हा आपल्या भारतीयांच्या रक्ताचाच गुण झालाय जणू!
भारताची बातच न्यारी! असा देश जगात एकमेवच! आपल्याला याचा नक्कीच अभिमान असला पाहिजे. म्हणजे तीन वेगळे ऋतु असलेला, भौगोलिक, प्रांतिक, भाषिक, धर्म-जात-पात या सगळ्याच बाबतीत एवढं वैविध्य असलेला भारत हा अतुलनियच म्हणायला हवा! आणि यात आता राजकारणाची भर पडली आहे असं म्हणायला हवं. एवढं पराकोटीचं राजकारण करणारा (ते पण आतल्याआत! जागतिक लेवलला अजून एवढं जमत नाय... असो!) भारत हा एक नंबरचाच देश असेल.
सध्या हे राजकारण सुरू होतं ते लोकांच्या घरातूनच. म्हणजे एक भाऊ संघीय तर दुसरा भाऊ कॉंग्रेसी, एक भाऊ पुरोगामी तर दुसरा प्रतिगामी असं काहीसं राजकारण आमच्या घरात शिरलंय.
कोणत्या थराचं राजकारण सध्या आम्ही करतोय हेच कळत नाहीये. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आली आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं पण अजूनही याला लोकशाही म्हणायचं का? हा प्रश्‍न आमच्या पुढं उभा राहतोय ही खूप मोठी शोकांतिका आहे.
जळून खाक झालेला देश पुन्हा उभा राहतो आणि एक नंबरला येतो पण आम्ही अजून रोटी, कपडा, मकान (जमिनी), मांस (कशाचं विचारू नका), चारा, रस्ते, सायकल, हात, घड्याळ, कमळ, बाण, बूट, चप्पल, टोमॅटो, अंडी (सॉरी थोडं भरकटलं...) यातच अडकलोय... हे सगळं कशामुळं? तर राजकारण...
तर या ठिकाणी मला असं म्हणायचंय या ठिकाणी की, हे काय चाललय या ठिकाणी... परत सॉरी... पण या राजकारणानं आपल्या देशाचंच हसं करून ठेवलंय ‘या ठिकाणी’... अरे जे विनोदाचा विषय झाले आहेत, ज्यांची भाषणं, वक्तव्यं ‘कॉमेडी क्लीप’ म्हणून समाजमाध्यमावर येतात त्यांना आपण राष्ट्रीय नेता कसं म्हणू शकतो... अरे नेता आहे की जोकर... पण हे बरं आहे. आपण लोकांचं भलं करू शकत नाही तर किमान मनोरंजन तरी करतोय याचं तरी समाधान भेटेल.
व्हॉट्स ऍपवर मध्यंतरी एक विनोद फिरत होता...
आपल्या देशात शेतकर्‍यांविषयी नेहमी कळवळा असणारा एकच पक्ष आहे... तो म्हणजे अपक्ष.
अगदी खरंय हे. पक्ष कुठलाही असो. ज्यावेळी ते अपक्षमध्ये असतात त्यावेळी शेतकरीच काय तर सार्‍या समाजाचा कळवळा फक्त त्यांनाच असतो. सगळ्या समस्या फक्त त्यांनाच दिसत असतात. कारण दुसरं काही काम नसल्यामुळं त्यांचा वेळ या समस्या शोधण्यातच जातो. म्हणूनच ते धाय मोकलून त्यासाठी ओरडत असतात. मात्र ज्यावेळी त्यांच्या हातात सत्ता येते ना... इतकं काम पडतं की त्यांना वेळच मिळत नाही या समस्यांकडं पहायला. ते तरी काय करणार बिच्चारे. खरं सांगतो मंडळी... मुद्दामहून नाय करत ते... एखाद्या योजनेसाठी अगदी सत्ताधार्‍यांच्या अंगावर जायचं आणि नंतर आत सुमडीत कुमडी करून आम्ही तुम्हाला तेवढे टक्के दिले होते आता तुम्ही आम्हाला एवढे द्या असं म्हणायचं.
एखादी गोष्ट जेवढी जुनी होईल तेवढी त्यात प्रगल्भता येत जाते. ज्येष्ठांचे सल्ले म्हणूनच बर्‍याच (सर्व नाही) ठिकाणी घेतले जातात. आता व्हिस्कीचच उदाहरण घ्या ना... ती जेवढी जुनी होत जाते तेवढी ती जास्त चढते. (असं म्हणतात... माझा अनुभव नाही.) मग आपल्या लोकशाहीच्याच बाबतीत उलटं का व्हायलंय बुवा... कुणीही उठावं, कुणाला काहीही बोलावं, काहीही करावं. अरं या बोलण्याला तर काही लगामच राहिला नाही.
‘आम्ही समाजात जाती-पाती, भेदभाव नष्ट करण्यासाठी धडपडत आहोत. आमचा तो ध्यासच आहे. म्हणूनच आम्ही ह्या जातीचा प्रतिनिधी पुढं आणलाय आणि त्या जातीला आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.’ अशा आदर्श संकल्पना तर आपल्याला नेहमीच पहायला मिळतायत. राजकीय नेत्यांनी दुतोंडी बोलणं, दुहेरी भुमिका घेणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा काही अपवाद वगळता हा तर राजकारण्यांचा आवडता छंद आहे. मी असं बोललोच नाही, माझ्या वाक्याचा विपर्यास केला, मला असं म्हणायचं होतं इत्यादी इत्यादी.
शेतकरी, जवान मरणे ही काही मोठी गोष्ट नाही पण माझ्या पोराच्या लग्नाला जर काही कमी पडलं तर तुमचं काही खरं नाही, अशा अविर्भावात सध्याचे नेते आहेत. नेता होणं म्हणजे समाजाच्या भल्याचा विचार सोडून स्वार्थी होणं, समाजाच्या नावावर स्वत:चा विकास करणं हा आताचा एक अलिखित नियम आहे. समाजाच्या भल्याचा विचार करणारे नेहमी दरिद्रीच राहतात, हे दुसरं सत्य.
समाजाचा, लोकांचा विचार करून करायचं काय? जर प्रत्येक राजकारण्याने समाजाचा विचार केला, त्यासाठी कार्य केले तर समाज सुधारेल, प्रगती करेल आणि मग यांना विचारणार कोण, नाही का? अरे याचा तर आपण विचारच करत नाही. तुमचं सगळं सुरळीत झालं तर मग तुम्ही त्या नेत्याला किंमतच देणार नाही. म्हणून तोही हाच विचार करतो की, जोपर्यंत यांना गरज आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. शेवटी तोही आपल्यातूनच वर गेला आहे ना! आपलाच प्रतिनिधी तो!
रोज सकाळी वृत्तपत्र उघडलं की पहिली एक शिवी घालायची, ‘ह्यांच्या .... ह्यांच्या’, मग एक फिलॉसॉफिकल भाषण झाडायचं आणि आपल्या कामाला लागायचं. या सवयीमुळे कुणाचा कुणाला ताळमेळच नाही. नेता फक्त निवडणुकीपुरता उगवतो आणि नंतर गायब होतो. परत तो दिसतो फक्त काही बातम्यांमध्ये. त्याला लोकांशी आणि लोकांना त्याच्याशी काही देणं-घेणंच नाही. हे असंच चाललंय आणि हे असंच चालू राहील. आपण फक्त या सगळ्या सिस्टिमला शिव्या देत राहू.
आणि खरंच जर याच्यात काही बदल व्हावा असं वाटत असेल तर सुरूवात स्वत:पासून करू. एकत्र येऊ आणि विचारमंथन करू, तेही शक्य झाल्यास त्यात राजकारण न करता. 



- तुषार उथळे पाटील 
७०५७२९२०९२ 

Sunday, March 26, 2017

पैसा पैसा हाय रे पैसा, उपर लेके जाऊँ कैसा...



आमच्या एका मैत्रिणीनं एक भन्नाट कल्पना सांगितली, जर अशी आकाशवाणी झाली की ‘एखाद्या माणसानं स्वतः कमावलेली सगळी संपत्ती त्याच्याबरोबरच नष्ट होईल.’ असं झालं तर काय होईल?
हा आमच्या विनोदाचा विषय झाला होता; पण खरंच असं झालं तर? एखादा माणूस मेला तर त्यानं घेतलेली महागडी कार, बांधलेला आलिशान बंगला, तिजोरीत, जमिनीत, छतात दडवून ठेवलेले बंडल त्याच्याबरोबरच गायब! मग माणूस एवढी मालमत्ता साठवून करेल काय? असं झालं तर माणूस खरं जगायला शिकेल. एक तर तो त्याला लागतं तेवढंच कमवेल आणि जास्त कमवलंच तर ते वाटून टाकेल. मग या जगात कुणीच गरीब राहणार नाही. व्वा! काय कल्पना आहे! पण दुःख याचं आहे की ही फक्त कल्पनाच आहे...
छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली, खूप संपत्ती मिळवली. याचा अर्थ शिवराय दरोडेखोर होते का? का त्यांनी ती सर्व संपत्ती रायगडावर साठवून ठेवली? असं त्यांनी केलं नाही म्हणून हा गुन्हा ठरला नाही. ही लूट त्यांनी केली ती स्वराज्यासाठी, स्वराज्यातील रयतेसाठी! आणि ही लूट करताना त्यांनी गरिबाला, सामान्याला अजिबात धक्का लावला नाही. ते छत्रपती होते!
आज त्याच छत्रपतींचं नाव घेणार्‍या समाजात काय होतं? आज एकाचा बंगला हा दुसर्‍याच्या रक्तावर उभा होतो. मी दोष देत नाहीये, अजिबात नाही. पैसा जरूर कमवावा. ती काळाची गरज आहे. पैसा कमवावा आणि त्याचा उपभोगही घ्यावा. यात गैर काहीच नाही. पण देश, समाज संकटात आणून, समाजस्वास्थ्य बिघडवून जर तो पैसा येत असेल तर त्याचा काय उपयोग? तुम्ही तुमचं आयुष्य जगाल, चांगलं जगाल पण त्याचवेळी कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी कराल त्याचं काय? पण जाऊ द्या त्यानं तुम्हाला काहीच फरक पडणार नाही...
आजकाल राजकारण, शासकीय अधिकार पदं, एवढंच काय अध्यात्मगुरू, डॉक्टरी पेशा याकडं लोकं प्रचंड पैसा मिळवण्याचं साधन म्हणून बघतात. यातून पाहिजे तेवढा पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते. समाज कल्याणासाठी असणार्‍या या गोष्टी आता समाज विघातक बनत चालल्या आहेत.
छत्रपतींच्या लूटीच्या धर्तीवर मला एक कल्पना सुचली. जर एखाद्यानं काही सहकार्‍यांसोबत अशा वाममार्गानं पैसा कमावलेल्या हरामखोरांना लुटलं आणि तो पैसा चांगल्या कामासाठी वापरला किंवा कोणत्याही मार्गानं त्याला तो सत्कारणी लावायला लावला तर... कल्पना चांगली आहे... पण बेटा असं फक्त चित्रपटातच होऊ शकतं! आज असं लूटतील पण एका वाईट मार्गाचा पैसा दुसर्‍या वाईट मार्गाला लावतील...
 मी पैशाला वाईट मूळीच म्हणत नाहीये. खूप लोक पैशाला वाईट, शत्रू मानतात; पण तसं मूळीच नाही. पैसा हा शत्रू नाहीये तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे; पण तो तुम्ही कसा कमावता आणि त्याचं काय करता हे महत्त्वाचं आहे. त्यावर तो वाईट ठरत असतो.
माणूस हा भावनाशील प्राणी आहे. प्रेम, क्रोध, राग लोभ, मोह, माया, मत्सर अशा अनेक भावना माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं बनवतात; पण यातील कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला तर तो प्राण्यापेक्षाही घातक होतो. लोभापोटी हव्यास जन्म घेतो आणि हा हव्यास वाढला की माणूस माणूस राहत नाही.
म्हणजे बघा. पायी चालायला लागलं की सायकल... सायकल मिळाली की दुचाकी... दुचाकी मिळाली की चारचाकी... चारचाकी मिळाली की अजून चांगली चारचाकी... हे संपतच नाही. मग यासाठी काय लागतं तर पैसा आणि तो पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचं.
मला खूप पैसा हवाय असं म्हणून त्याच्या मागं धावणार्‍या लोकांची मला कीव येते. ज्यासाठी ते पैसा कमवत असतात, म्हणजे सुख, समाधान, समृद्धी यांनाच विसरून, बाजूला सारून, सोडून देऊन ते फक्त पैशाच्या मागे धावत राहतात. कारण लहानपणापासून आपल्याला हेच शिकवलं जातं की तुला चांगलं जगायचं असेल तर जास्त पैसा कमावला पाहिजे आणि जास्त पैसे कमावण्यासाठी चांगली नोकरी केली पाहिजे. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम म्हणतात, आपल्या देशात जोपर्यंत चांगले शिक्षण म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना आहे तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही.
पैसा मिळवणं खूप अवघड असतं का? ज्यासाठी बरेच लोक आपलं संपूर्ण आयुष्य निरसपणे पळण्यात घालवतात. या पैशाच्या मोहामुळं आणि अंधश्रद्धेमुळं लोक या उंदराच्या दौडीलाच आयुष्य समजून बसलेत. माझे एक गुरू मला म्हणायचे, ‘हे मार्केट म्हणजे पैशाचा समुद्र आहे. त्यातून पैसा कसा घ्यायचा म्हणजे चमच्याने, तांब्याने की बादलीने हे तुम्ही ठरवायचं.’
चांगल्या प्रकारे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पण मुद्दा हा आहे की आमच्याकडे पैशाबद्दल अंद्धश्रद्धाच जास्त आहेत. आम्ही पैसा वाढवण्यापेक्षा पैसा साठवण्यावर जास्त विश्‍वास ठेवतो. माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं की संपलं... मग एक एक पैशासाठी धडपडत रहायचं. यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी खूप छान थिअरी सांगितली आहे. कोणतीही गोष्ट मला परवडत नाही असं कधीच म्हणू नका, त्याऐवजी असं म्हणा, मला ती गोेष्ट कशी परवडेल... मग बघा तुम्ही कसे कामाला लागाल ते!
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आधी आपण द्यायला शिकलं पाहिजे, हे आम्ही समजूनच घेत नाही. आम्हाला फक्त मिळवायचंय आणि साठवायचंय. लहानपणी एक खूप छान गोष्ट वाचली होती.
एक साधू एका गावातील कंजूस मानल्या जाणार्‍या व्यापार्‍याच्या घरी जातात व एक भाकरी मागतात. तो व्यापारी दार लावून घेतो. संध्याकाळी तो व्यापारी पाहतो तर साधू तिथेच. रात्री कंटाळून तो व्यापारी त्यांना एक भाकरी देतो. त्यावेळी साधू नकार देतात व दोन भाकरीची मागणी करतात. व्यापारी परत नकार देतो. असेच सात दिवस चालते. प्रत्येकवेळी साधू एक भाकरी वाढवून मागतात व व्यापारी नकार देतो. शेवटी साधूंची प्रकृती खालावलेली पाहून व्यापारी घाबरतो आणि साधूंना म्हणतो, ‘‘तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी घ्या पण आता इथून जा.’’
त्यावर ते साधू म्हणतात, ‘‘आता मला भाकरी नकोच आहे. आता तू मला एक विहीर खोदून दे.’’
सुरूवातीला व्यापारी नकार देतो पर नंतर नाईजास्तव होकार देतो; पण त्यावर ‘मला काय मिळेल’ असं तो विचारतो. साधू म्हणतात, ‘‘तू दोन विहीरी खोद. एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. मी भ्रमंती करून जेव्हा माघारी येईन त्यावेळी जर तुझ्या विहीरीत माझ्या विहीरीपेक्षा जास्त पाणी असेल तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन.’’
व्यापारी खुश होतो. आता साधूंकडून खूप संपत्तीचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तो दोन विहीरी खोदतो. पाणी कमी होऊ नये म्हणून तो स्वत:ची विहीर झाकून ठेवतो आणि साधूंसाठी खोदलेल्या विहीरीतून संपूर्ण गावाला पाणी देतो. ते पाणी कमी करण्यासाठी तो सतत पाणी उपसत राहतो. काही दिवसांनी साधू परत येतात. तो व्यापारी खुशीने साधूंना दोन्ही विहीरी दाखवतो; पण त्याच्या लक्षात येते की आपली विहीर झाकून ठेवली असली तरी साधूंच्याच विहीरीत पाणी जास्त आहे. तेव्हापासून तो व्यापारी दाता म्हणून प्रसिद्ध होतो.

हा निसर्गाचा नियम आहे. काहीतरी मिळवण्यासाठी आधी तुम्हाला द्यायला शिकलं पाहिजे. पैशाच्या बाबतीतही हा नियम लागू होतो; पण तरीही लोक एवढा पैसा साठवून ठेवतात, याचच आश्‍चर्य वाटतं. पैशाच्या मागं धावण्यात सगळा वेळ, शक्ती घालवण्यापेक्षा पैशाला कामाला लावा आणि थोडा वेळ स्वत:साठी आणि आपल्या जीवलगांसाठी द्या.
पैसा पैसा हाय रे पैसा, उपर लेके जाऊँ कैसा...
जर आपल्यानंतर हे सर्व इथेच राहणार आहे तर मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला? आपल्या आजुबाजूला एवढ्या समस्या, उणीवा दिसत असताना आपण दगड होणं बरं नाही. स्वत: जीवन जगा आणि दुसर्‍याचं जीवन आनंदी होण्यासाठी थोडा प्रयत्न करा... बस्स!
खरंच पैसा एवढा महत्त्वाचा असतो का? नाही, सध्याच्या जगात पैसा महत्त्वाचा आहेच; पण तो किती आणि कसा? आणि फक्त पैसाच महत्त्वाचा आहे का? याचा पण विचार व्हायला हवा.

Sunday, March 19, 2017

पैसा... पैसा... आणि फक्त पैसा...


क्यूं पैसा पैसा करती है, क्यूं पैसे पे तू मरती है
इक बात मुझे बतलादे तू उस रब से क्यूं नही डरती है

अक्षय कुमारच्या ‘दे दणा दण’ या सिनेमतील हे गाणं आहे. सारखा पैसा मागणार्‍या आपल्या प्रेयसीसाठी तो हे गाणं म्हणतो; पण सध्या या दोन ओळी समाजातील बर्‍याच लोकांसाठी म्हणाव्याशा वाटतात.
कोण म्हणतं सध्या कलयुग चालू आहे. सध्या चालू आहे ते फक्त ‘धनयुग’! पैसा... पैसा... आणि फक्त पैसा! ‘अपना सपना... मनी... मनी... मनी...’ असं म्हणत सगळे फक्त पैशाच्या मागे धावतायेत. आज जगात सर्वश्रेष्ठ जर कुठली गोष्ट असेल तर तो फक्त पैसा आहे. ‘ना बिवी ना बच्चा ना बाप बडा ना मैय्या... द व्होल थिंग इज दॅट की भैय्या सबसे बडा रूपय्या..’ अशी सध्याची परिस्थिती आहे.
पैशासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. अगदी आपल्या स्वकियांचे प्राण घ्यायलाही, बापाला घराबाहेर काढायलाही लोक कचरत नाहीयेत. कारण पैसा हा सध्या प्रतिष्ठेचा, ‘स्टेटस’चा विषय आहे! पैशाशिवाय सध्या पानही (कागदही, प्रेयसीही, अधिकारीही, कामगारही) हलत नाही... मग हा पैसा आपल्याकडे नको? सध्याच्या या धनयुगात धन म्हणजे पैसा असेल तर तुम्ही काय करू शकत नाही? सगळं करू शकता... एव्हरीथिंग...
ज्याच्याकडे पैसा नाही तो माणूस या जगात फक्त किड्यामुंग्यांसारखा एक तुच्छ जीव आहे. त्याला काहीही किंमत नाही. तो फक्त हेटाळणीसाठी जगत असतो. मरण येत नाही म्हणून जगत असतो. खरं तर त्याला जगण्याचा अधिकारच नाहीये; तरीही तो जगत असतो. का जगतात ही भिकारडी लोकं? अशीच श्रीमंतांची धारणा असते.
काही लोक म्हणतात, ‘मला पैशाची काही हौस नाही. मी पैशासाठी काम करत नाही. मला जेवढं मिळतंय तेवढ्यात मी समाधानी आहे.’ मात्र यात तथ्य नसतं. यांनीही प्रयत्न केलेले असतात पण जास्त पैसे मिळवता येत नाही म्हणून ते या उपदेशापर्यंत पोहोचतात. थोडक्यात ‘संधी अभावी साधू.’ शेवटी काय पैसा... पैसा... आणि फक्त पैसा...
मी एका ठिकाणी वाचलं होतं की ‘पैसा हे साध्य नाही तर साधन आहे’. म्हणजे काय? तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पैसा हा तुम्हाला मदत करेल पण कुठं पोहचायचंय हे तुम्हालाच ठरवायला हवं. फक्त पैसाच कमवायचाय हे जीवनध्येय कधीच होऊ शकत नाही; पण सध्या परिस्थिती तीच आहे. आताच्या पिढ्या या बालपणातून निघाल्यापासून मरेपर्यंत फक्त पैशासाठी धावतायत.
माझे खूप मित्र असं म्हणतात, ‘मला खूप म्हणजे प्रचंड पैसा कमवायचाय...’ पण एवढा पैसा कमावून करणार काय हेच त्यांना माहिती नसतं. हे त्यांचं मत निर्माण होतं आकर्षणातून! चित्रपटामध्ये किंवा आजुबाजूला बघितलेल्या शानशौकीतून... आम्ही बघितलेलं असतं की भोवताली काही लोक खूप पैसा खर्च करतायत आणि आम्हाला शंभर-दोनशे रूपयांसाठी मारामार करावी लागतेय.  त्यांना जर ‘का?’ असं विचारलं तर तीच टिपिकल उत्तरं येतात. ‘बीएमडब्ल्यू/स्कोडा/ऑडी/लँडरोव्हर गाडी घेणार... एक मोठा बंगला बांधणार... गावात सगळ्यात मोठा बंगला आपला पाहिजे... मग त्यात हे हवं ते हवं... इथं एक घर... तिथं एक घर... असं लाईफस्टाईल... तसं लाईफस्टाईल... ह्या कंपनीचं घड्याळ... त्या कंपनीचा मोबाईल... ह्या-त्या देशात फिरायला जायचं...’ याच्यापुढं विचार जातच नाहीत.
यामुळं आजची पिढी भरकटत चाललीय. बरीच मुलं कमी कष्टात आणि कमी वेळेत पैसा मिळवण्याचा अट्टाहास करतायत. त्यामुळं एक तर ती फसतात किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पैसा हा का कमवायचा याच्या संकल्पनाच चुकीच्या आहेत. राष्ट्र, समाज या गोेष्टींना कधीच तिलांजली मिळालीय. या जगात कुणी कुणाचं नाही. खरा आहे तो फक्त पैसा. हा आत्ताचा मूलमंत्र आहे.
स्वत:च्या गरजेपेक्षा जास्त पैसा कमवायचा आणि तो दाखवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. असं म्हणतात मुलींना कधी वय आणि मुलांना कधी पगार विचारू नये. याचं कारण हेच आहे. मुलं आपला पगार नेहमी जास्तच सांगणार. कारण कमी पगाराची त्यांना लाज वाटते, गरिबीची त्यांना लाज वाटते.
ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे तो अधिक येत राहतो आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्या हातातून नेहमीच निसटत राहतो. पण असं का होतं याचं उत्तर कोणीच शोधत नाही. फक्त रडत किंवा पळत रहायचं! जगातील 96 टक्के पैसा हा 4 टक्के लोकांकडे आहे. बाकीचे फक्त धावतायत. मध्यमवर्गीय समाज हा अर्थतज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकींनी सांगितलेल्या ‘रेट रेस’ म्हणजे उंदराच्या दौडीत अडकलाय. पैशासाठी तो आपला प्रत्येक दिवस पळण्यात घालवतोय. गझलकार नितिन देशमुख यांची सुंदर गझल आहे,
जळणार्‍याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही
जगणार्‍याला जीवन कळते, पळणार्‍याला नाही

मग जीवन जगण्यासाठी काय लागतं? पैसा लागतोच. मी नाही कुठे म्हणतोय. पण फक्त पैशानच सारं काही मिळतं असं थोडंच आहे. आईच्या कुशीत, बायकोच्या प्रेमळ मिठीत, मित्रांच्या सहवासात मिळणारं समाधान, आनंद याची तुलना तुम्ही पैशाशी कशी करू शकता? तुमचं एक हास्य पुढच्याला आनंदी करत असेल तर तिथं दुसरं काय हवं?


पैसा किती कमवावा याचं काही प्रमाण आहे की नाही? तुमच्या गरजा किती असतात, किती असाव्यात? तुम्ही कितीही चांगली जीवनपद्धती अवलंबिली तरी त्यासाठी किती खर्च होऊ शकतो? मग उरलेला पैसा काय कामाचा? कोणतीही गोष्ट अति झाली की ती विष होते असं म्हणतात. पण सध्या माणसाला किती खावं याचं प्रमाणच राहिलं नाही. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली तरी एखादा खातोय आणि दुसरीकडे एखादा उपाशी मरतोय... काय म्हणावं याला?
आपली गरज हजारात असताना लाखो किंवा आपली गरज लाखोत असताना करोडो कमावून आणि तो साठवून ठेवून लोक काय करतात? हे मला अजून न उलगडलेलं कोडं आहे. ‘त्यानं पुढच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमावलाय’ अशी वाक्यं आपण नेहमी ऐकतो. मग एवढ्या पिढ्यांना निष्क्रिय बनवून काय साध्य होत असेल? आणि जर तुमची एखादी पिढी कमी करून तुम्ही दुसर्‍याची एखादी पिढी वर आणली तर काय होईल?
माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो, ‘तुषार, जगात पैशाशिवाय काही नाही. पैसा फेको तमाशा देखो. जोपर्यंत गावात तू मोठी गाडी घेऊन जात नाहीस तोपर्यंत गावातले लोक तुझ्याकडे आदरानं बघत नाहीत...’ असं बरंच काही. पण मला नाही तसं वाटत. अर्थात हे माझं मत. तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि तुम्ही शेजार्‍याला अडचणीत मदत करत नसाल तर तुम्हाला मान कसा मिळेल? आणि जो मिळेल तो खरा असेल का? जसे गुळाला पाहून चिकटणारे मुंगळे असतात तसे पैसा पाहून जवळ येणारे काही स्वार्थी लोकसुद्धा असतात. ज्याच्याकडे पैसा आहे तो दादा, भाऊ, साहेब असणारच. सध्याचे नेते तरी काय या पैशातूनच जन्माला येतात.
या पैशासाठी माणूस अगदी हीन पातळीवर जायला तयार झालाय. या पैशानं माझ्या समाजाचं काय केलं? तर सगळं गटार, चिखल करून टाकलंय... या घाणीत मग काय निपजणार? पैशासाठी दुसर्‍याला लुबाडणारी, फसवणारी, हत्या करणारी... एवढंच काय स्वत:च्या बायकोला, मुलीला देहविक्री करायला लावणारी कीड या घाणीत वळवळतेय... त्यामुळे आपला समाज, आपली संस्कृती पोकळ होत चाललीय.
हे कुठेतरी थांबायला हवं. ओंजळ भरून वाहण्याच्या आधी ती वाटायला शिकायला हवं. तुमचं पोट फुटायच्या आधी तुम्ही दुसर्‍याचा पोटाचा थोडातरी विचार करायला हवा. ‘काहीतरी मिळण्यासाठी आधी द्यायला शिका’ हा ‘युनिव्हर्सल’ नियम आहे.


- तुषार उथळे पाटील 
९५५२८५८१००

Sunday, March 5, 2017

डे... डे... डे...


‘जानू, आज रोज डे आहे.‘ दे गुलाब ती गुलाबी होईपर्यंत!
‘जानू, आज प्रपोज डे आहे.‘ कर प्रपोज तिला वीट येईपर्यंत!
‘जानू, आज चॉकलेट डे आहे.‘ दे चॉकलेट तिचे दात किडेपर्यंत!
‘जानू, आज टेडी डे आहे.‘ दे बाहुली तुझ्या बाहुलीला आणि होऊ दे तुझंही खेळणं एकदा!
‘जानू, आज प्रॉमिस डे आहे.‘ दे तिला वचनं भरभरून. त्याला काय भाडं लागतं का?
‘जानू, आज किस डे आहे.‘ घे चुंबन तिचं करून टाक लालेलाल!
‘जानू, आज हग डे आहे.‘ घे मिठीत तिला तिची हाडं खिळखिळी होईपर्यंत!
आणि शेवटी
व्हॅलेंटाईन डे. आता काय? कर काय करायचं ते!
हुश्श!!! प्रेमाचा सप्ताह. केवढं रे बाबा हे! आणि यात मुलंच नाही तर मुलीही तेवढ्यात आघाडीवर असतात. प्रेमवीरांना तर उसंतच नाही या आठवड्यात. किती खरेदी करायची. वेगवेगळ्या कलरचे गुलाब, ग्रीटींग्ज, टेडीज, देश-विदेशातले, वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स, नवीन कपडे, मेक-अप वगैरे वगैरे वगैरे. आठवडाभर या जगात नसणारच आम्ही. पण खरंच या सगळ्याची गरज असते का?
मला कुणीतरी म्हणालं, ‘तुला गर्लफ्रेंड नाही म्हणून असं म्हणतोय.’ अरे अंधानुकरण करणार्‍या माझ्या पुरोगामी, फॉरवर्ड मित्रांनो प्रेयसीला जवळ घ्यायला, तिला मिठीत घ्यायला, तिचं चुंबन घ्यायला, प्रेम व्यक्त करायला मला कुठल्या विशिष्ट दिवसाची गरज आहे का? अहो आमच्या (पुण्यातील) झेडब्रीजवर तर रोजच किसडे साजरा होतो!
या सगळ्याची गरज पडते जेव्हा तुमच्यात विश्‍वास नसतो तेव्हा. प्रेम हे विश्‍वासाच्या पायावर उभं असावं लागतं. जेव्हा एकमेकांवर विश्‍वास नसतो तेव्हा अशा कारणांची मदत घ्यावी लागते किंवा मग तुमचा फक्त टाईमपास चाललेला असतो. मग असे सण साजरे करावेच लागतील. त्याशिवाय मनोरंजन कसे होणार? ‘चान्स’ कसा मिळणार?
या सर्व प्रेमवीरांना माझी विनंती आहे की फक्त एकदा इंटरनेटवर ‘व्हॅलेंटाईन डे’ असा सर्च मारा. मग बघा हे अंतरजाल तुम्हाला काय काय सांगतं ते. रोममधील संताने सुरू केलेली ही परंपरा. जगभर तिचा विस्तार व चुकीचा प्रचार, प्रसार होत गेला.
सध्या सगळीकडे निवडणुकीचा माहोल आहे. पण आमच्या प्रेमवीरांचा राजकारणाशी काय संबंध? आम्ही आमच्या विश्‍वात मश्गुल आहोत. तरीही तुझी ती पार्टी आणि माझी ही पार्टी म्हणून ब्रेकअप घेणारीही जोडपी आहेतच की. अशा ‘डें’चा आधार घेणार्‍यांना वेगळं व्हायला काय कोणतंही कारण पुरेल.
मित्रांनो प्रेम ही चिरंतन, निर्मळ भावना आहे. त्यासाठी काही ‘नाटकं’ करायची गरज लागत नाही. आता या सगळ्यांचा एक ‘रोग डे’ साजरा करावा लागेल. सोडा सगळं आणि खरं प्रेम करा.
एक सांगेन प्रेम हे व्यक्त करावं लागतंच आणि फक्त बोलून चालत नाही तर ते दाखवावंही लागतं पण त्यासाठी कुठल्याही ‘डे’ची कुबडी घ्यावी लागत नाही. थोडासा विश्‍वास पेरलात तरी पुरेसा आहे.

(‘व्हेलेंटाईन डे’च्या निमित्ताने साप्ताहिक ‘चपराक’मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख...)

- तुषार उथळे पाटील 
९५५२८५८१००

प्रेम, आकर्षण आणि वासना!



‘‘पीरेम म्हंजी काय असतं रं भौ? आमाला रोजच्या भाकरीचा प्रश्‍न. कुटं करत बस्तु पीरेम आणि बाकी झंझटी!’’
हे वाक्य अतिशयोक्तीपूर्ण अजिबात नाही. हेही एक वास्तव आहेच. जेव्हा काही लोकांच्या पोटाची जबाबदारी आपल्या हातावर असते, तेव्हा मनाचा विचार केला जात नाही किंवा घेतला जात नाही!
पण खरंच ‘प्रेम म्हणजे काय असतं भाऊ?’
असं म्हणलं जातं की स्त्रीला समजणं अशक्य आहे. तसंच प्रेम या भावनेबद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही! प्रेम ही गोेट समजणं खूप अवघड आहे; पण खरं तर ती मुद्दामहून समजून घ्यायचीही नसते. ती आपोआप, नकळतपणे होणारी व जाणवणारी भावना आहे. प्रत्येकासाठी ती वेगळी असू शकते. त्यामुळे प्रेमाची तंत्रशुद्ध व्याख्या शोधण्याचा कुणाही मुर्खाने प्रयत्न करू नये.
आकर्षण, वासना व प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथंच आपली गल्लत होते ना राव! आपण आकर्षणाला किंवा वासनेला प्रेम समजून बसतो. कदाचित त्यावेळी आपल्याला ते कळत नाही.
एका पुस्तकात आईपणाबद्दल खूप छान वाक्य वाचलं, ‘बाळाला जन्म देणे ही एक गोष्ट आहे आणि आई होणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.’ तसंच प्रेमाचंपण म्हणता येईल ना भाऊ! एखाद्या व्यक्तिकडे आकर्षित होणं वेगळं आणि त्या व्यक्तिवर प्रेम करणं किंवा त्याचं प्रेम मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे.
प्रेमाचे कितीतरी म्हणजे असंख्य पैलू सांगता येतील. प्रत्येकाच्या मनात जी प्रामाणिक, निर्मळ भावना येईल तो प्रेमाचा एक पैलू असू शकेल.
’ती सध्या काय करते’ या नवीन आलेल्या चित्रपटात असाच एक प्रेमाचा पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला गेलाय. अव्यक्त राहिलेलं प्रेम आणि त्यामुळे होणारी घुसमट, त्यातून निर्माण होणार्‍या समस्या आणि या सर्वातून बाहेर निघण्याचा प्रयत्न असा एक सुंदर अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. याप्रमाणेच अनेक चित्रपटातून प्रेम ही भावना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
शाळेत किंवा विद्यालयात जे वाटते ते प्रेम असते का? त्या काळात हा निवाडा करणं शक्य असतं का? आपण त्याला आकर्षण म्हणू शकतो. आताच्या युगात हे आकर्षणसुद्धा खूप लवकर मुलांना जाणवायला लागलंय. आता आमच्या काळात कसं होतं हे मी सांगत बसत नाही नाही! (हा... हा... हा...)
ज्यावेळी आपण या स्टेजमधून पुढं येतो म्हणजे ‘कॉलेज लाईफ.’ त्यावेळी त्यात थोडासा वासनेचा शिडकावा होतो. मग ’ती सध्या काय करते’मधील अनुराग प्रमाणे ’पहला प्यार बार बार लगातार’! या वयात शरीरात बदल झाल्यामुळे त्याच्या मागण्या वाढलेल्या असतात आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मुलं खूप उद्योग करतात; पण या सगळ्याचा संबंध प्रेमाशी असतो का? तो जोडला जातो हा भाग वेगळा! आणि प्रेमाशी याचा संबंध आजिबातच नसतो असंही नाही! पण प्रामाणिक, निस्वार्थी भावना कमीच असतात. जर अशा नात्यात तुम्हाला फक्त जोडीदाराच्या शरीराची अपेक्षा असेल तर त्यात काय प्रेम राहणार?
ही ‘फर्स्ट साईट लव्ह’ ही काय भानगड असते? एका नजरेत तुम्ही एखाद्या व्यक्तिला कसं ओळखू शकता? मग त्या नजरेत तुम्हाला काय दिसतं? तुम्ही फक्त रूप पाहता आणि ती व्यक्ती तुम्हाला आवडते. मग याला ‘फर्स्ट साईट अट्रेक्शन’ म्हणलं तर?
कवी माधव गिर यांच्या कवितेतील ओळीप्रमाणं,
तुला मला दोघांनाही सारं सारं कळतंय
तुझं माझं दोघांचंही मन आतून जळतंय
’ असंच सगळे म्हणत असतात. (खरंतर कुणालाही काही कळत नसतं!)

अशा संबंधात काही वेळा प्रेमही होतं. ते बहरतं आणि फुलतंही! प्रेम ही एक निर्मळ आणि निस्वार्थ भावना आहे. ज्यात पुढच्याला गृहीत न धरता त्याच्या भावनेचा, मताचा आदर केला जातो. (अर्थात ही माझी मतं आहेत)
आई बाळाला जन्म देते, दूध पाजते, वाढवते, त्यावेळी तिच्या मनात काय स्वार्थ असतो? हे सर्व निस्वार्थ असते.
प्रत्येक भावना ही बोलूनच व्यक्त करावी लागते असं नाही. काही भावना स्पर्शातून तर काही डोळ्यांवाटे व्यक्त होतात. प्रेम हे या सर्वातून दर्शवू शकतो. खरंतर प्रेम दाखवून द्यायची पण गरज नसते; जर खरंच प्रेम असेल ते पुढच्याला आपोआप जाणवतं.
रोज सकाळी बाहेर जाताना आईच्या पायांना कलेला स्पर्श आणि बायकोला मारलेली मिठी आपलं प्रेम पोहचवण्यासाठी पुरेसं असतं.
मी प्रेमाबद्दल एवढं का बोलतोय? पहिली आई व नंतर काम याशिवाय मला कोणावर प्रेम करताच आलं नाही... असं कोणी भेटलंही नाही. माझं दुर्भाग्य! हां पण काही आकर्षणं होती; नाही का म्हणू!
हातात हात गुंफून अनवाणी पायानं ओल्या वाळूवर फिरणं म्हणजे प्रेम असेल तर मला ते अनुभवायचंय...
तिच्या डोळ्यात पाणी पाहून आपल्या पापण्या ओलावणं म्हणजे प्रेम असेल तर मला ते अनुभवायचंय...
एकमेकांच्या मिठीत शिरताना संकोचा ऐवजी आपलेपणा व आधार वाटत असेल असं प्रेम मला अनुभवायचंय...
न सांगताही जोडीदाराच्या समस्या ओळखून त्या कमी करण्याचा प्रयत्न करणारं प्रेम मला करायचंय...
आणि एवढंच म्हणेण की तुम्हीही प्रेम करत रहा. निस्वार्थ, प्रमाणिक आणि खरं प्रेम!
- तुषार उथळे पाटील
9552858100