Monday, April 17, 2017

याला राजकारण ऐसे नाव...



आपल्या देशात तीन विषयांना कधीच मरण नाही असं म्हणतात. हे तीन विषय निघाले की गावाचा पार असो, कॉलेजचा कट्टा असो, ऑफिस असो वा प्रवास असो... या तीन विषयांवर तुफान चर्चा होते. मग त्यातील काही माहिती असो वा नसो... ते तीन विषय म्हणजे सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण...
सिनेमा व क्रिकेट मधील दोन-चार नावं जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सहज या चर्चेत सहभागी होऊ शकता! आणि राजकारण... राजकारण तर आपल्या अगदी जवळचा विषय आहे. अगदी घरात, ऑफिसमध्ये, आपण सभासद असलेल्या एखाद्या संस्थेत सगळीकडे आपल्याला आजकाल हे राजकारण अनुभवायला मिळतं. राजकारण हा आपल्या भारतीयांच्या रक्ताचाच गुण झालाय जणू!
भारताची बातच न्यारी! असा देश जगात एकमेवच! आपल्याला याचा नक्कीच अभिमान असला पाहिजे. म्हणजे तीन वेगळे ऋतु असलेला, भौगोलिक, प्रांतिक, भाषिक, धर्म-जात-पात या सगळ्याच बाबतीत एवढं वैविध्य असलेला भारत हा अतुलनियच म्हणायला हवा! आणि यात आता राजकारणाची भर पडली आहे असं म्हणायला हवं. एवढं पराकोटीचं राजकारण करणारा (ते पण आतल्याआत! जागतिक लेवलला अजून एवढं जमत नाय... असो!) भारत हा एक नंबरचाच देश असेल.
सध्या हे राजकारण सुरू होतं ते लोकांच्या घरातूनच. म्हणजे एक भाऊ संघीय तर दुसरा भाऊ कॉंग्रेसी, एक भाऊ पुरोगामी तर दुसरा प्रतिगामी असं काहीसं राजकारण आमच्या घरात शिरलंय.
कोणत्या थराचं राजकारण सध्या आम्ही करतोय हेच कळत नाहीये. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आली आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं पण अजूनही याला लोकशाही म्हणायचं का? हा प्रश्‍न आमच्या पुढं उभा राहतोय ही खूप मोठी शोकांतिका आहे.
जळून खाक झालेला देश पुन्हा उभा राहतो आणि एक नंबरला येतो पण आम्ही अजून रोटी, कपडा, मकान (जमिनी), मांस (कशाचं विचारू नका), चारा, रस्ते, सायकल, हात, घड्याळ, कमळ, बाण, बूट, चप्पल, टोमॅटो, अंडी (सॉरी थोडं भरकटलं...) यातच अडकलोय... हे सगळं कशामुळं? तर राजकारण...
तर या ठिकाणी मला असं म्हणायचंय या ठिकाणी की, हे काय चाललय या ठिकाणी... परत सॉरी... पण या राजकारणानं आपल्या देशाचंच हसं करून ठेवलंय ‘या ठिकाणी’... अरे जे विनोदाचा विषय झाले आहेत, ज्यांची भाषणं, वक्तव्यं ‘कॉमेडी क्लीप’ म्हणून समाजमाध्यमावर येतात त्यांना आपण राष्ट्रीय नेता कसं म्हणू शकतो... अरे नेता आहे की जोकर... पण हे बरं आहे. आपण लोकांचं भलं करू शकत नाही तर किमान मनोरंजन तरी करतोय याचं तरी समाधान भेटेल.
व्हॉट्स ऍपवर मध्यंतरी एक विनोद फिरत होता...
आपल्या देशात शेतकर्‍यांविषयी नेहमी कळवळा असणारा एकच पक्ष आहे... तो म्हणजे अपक्ष.
अगदी खरंय हे. पक्ष कुठलाही असो. ज्यावेळी ते अपक्षमध्ये असतात त्यावेळी शेतकरीच काय तर सार्‍या समाजाचा कळवळा फक्त त्यांनाच असतो. सगळ्या समस्या फक्त त्यांनाच दिसत असतात. कारण दुसरं काही काम नसल्यामुळं त्यांचा वेळ या समस्या शोधण्यातच जातो. म्हणूनच ते धाय मोकलून त्यासाठी ओरडत असतात. मात्र ज्यावेळी त्यांच्या हातात सत्ता येते ना... इतकं काम पडतं की त्यांना वेळच मिळत नाही या समस्यांकडं पहायला. ते तरी काय करणार बिच्चारे. खरं सांगतो मंडळी... मुद्दामहून नाय करत ते... एखाद्या योजनेसाठी अगदी सत्ताधार्‍यांच्या अंगावर जायचं आणि नंतर आत सुमडीत कुमडी करून आम्ही तुम्हाला तेवढे टक्के दिले होते आता तुम्ही आम्हाला एवढे द्या असं म्हणायचं.
एखादी गोष्ट जेवढी जुनी होईल तेवढी त्यात प्रगल्भता येत जाते. ज्येष्ठांचे सल्ले म्हणूनच बर्‍याच (सर्व नाही) ठिकाणी घेतले जातात. आता व्हिस्कीचच उदाहरण घ्या ना... ती जेवढी जुनी होत जाते तेवढी ती जास्त चढते. (असं म्हणतात... माझा अनुभव नाही.) मग आपल्या लोकशाहीच्याच बाबतीत उलटं का व्हायलंय बुवा... कुणीही उठावं, कुणाला काहीही बोलावं, काहीही करावं. अरं या बोलण्याला तर काही लगामच राहिला नाही.
‘आम्ही समाजात जाती-पाती, भेदभाव नष्ट करण्यासाठी धडपडत आहोत. आमचा तो ध्यासच आहे. म्हणूनच आम्ही ह्या जातीचा प्रतिनिधी पुढं आणलाय आणि त्या जातीला आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.’ अशा आदर्श संकल्पना तर आपल्याला नेहमीच पहायला मिळतायत. राजकीय नेत्यांनी दुतोंडी बोलणं, दुहेरी भुमिका घेणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा काही अपवाद वगळता हा तर राजकारण्यांचा आवडता छंद आहे. मी असं बोललोच नाही, माझ्या वाक्याचा विपर्यास केला, मला असं म्हणायचं होतं इत्यादी इत्यादी.
शेतकरी, जवान मरणे ही काही मोठी गोष्ट नाही पण माझ्या पोराच्या लग्नाला जर काही कमी पडलं तर तुमचं काही खरं नाही, अशा अविर्भावात सध्याचे नेते आहेत. नेता होणं म्हणजे समाजाच्या भल्याचा विचार सोडून स्वार्थी होणं, समाजाच्या नावावर स्वत:चा विकास करणं हा आताचा एक अलिखित नियम आहे. समाजाच्या भल्याचा विचार करणारे नेहमी दरिद्रीच राहतात, हे दुसरं सत्य.
समाजाचा, लोकांचा विचार करून करायचं काय? जर प्रत्येक राजकारण्याने समाजाचा विचार केला, त्यासाठी कार्य केले तर समाज सुधारेल, प्रगती करेल आणि मग यांना विचारणार कोण, नाही का? अरे याचा तर आपण विचारच करत नाही. तुमचं सगळं सुरळीत झालं तर मग तुम्ही त्या नेत्याला किंमतच देणार नाही. म्हणून तोही हाच विचार करतो की, जोपर्यंत यांना गरज आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. शेवटी तोही आपल्यातूनच वर गेला आहे ना! आपलाच प्रतिनिधी तो!
रोज सकाळी वृत्तपत्र उघडलं की पहिली एक शिवी घालायची, ‘ह्यांच्या .... ह्यांच्या’, मग एक फिलॉसॉफिकल भाषण झाडायचं आणि आपल्या कामाला लागायचं. या सवयीमुळे कुणाचा कुणाला ताळमेळच नाही. नेता फक्त निवडणुकीपुरता उगवतो आणि नंतर गायब होतो. परत तो दिसतो फक्त काही बातम्यांमध्ये. त्याला लोकांशी आणि लोकांना त्याच्याशी काही देणं-घेणंच नाही. हे असंच चाललंय आणि हे असंच चालू राहील. आपण फक्त या सगळ्या सिस्टिमला शिव्या देत राहू.
आणि खरंच जर याच्यात काही बदल व्हावा असं वाटत असेल तर सुरूवात स्वत:पासून करू. एकत्र येऊ आणि विचारमंथन करू, तेही शक्य झाल्यास त्यात राजकारण न करता. 



- तुषार उथळे पाटील 
७०५७२९२०९२ 

1 comment:

  1. जबरदस्त आणि जळजळीत विचार मांडलेस तुषार तू । आजच्या तरुणाईचा बुलंद विचार तुझ्या लेखणीतून पाझरतांना जाणवतो व शिथील पडलेल्या संवेदना जागृत करतो । अभिनंदन

    ReplyDelete