Monday, May 8, 2017

तुझं आहे तुजपाशी


‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ अशी तुकोबारायांच्या अभंगातील एक ओळ आहे. संतश्रेष्ठांच्या अभंगांचे अर्थ काढायला गेले तर त्यांच्या प्रत्येक अभंगावर एक पुस्तक तयार होईल. पण आपण जर फक्त या एका ओळीचा विचार केला तर यातून तुम्हाला पाहिजे तसा अर्थ तुम्ही काढू शकाल.
तुझे आहे तुज पाशी! अशा कित्येक गोष्टी, बहुतेक गोष्टी या आपल्यापाशीच असतात. आपल्यापाशी म्हणजे काय तर आपल्या जवळ, आपल्या आसपास किंवा आपल्या अंतरंगात असतात. मात्र आपण त्या बाहेर शोधत बसतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास, धाडस, सकारात्मकता या गोष्टी आपल्याला उसण्या नाही आणता येत. त्या आपल्यातच असतात फक्त त्या जागृत कराव्या लागतात.
आपल्याला सवयच लागलेली आहे की एखादी गोष्ट जमली नाही किंवा मिळाली नाही तर वेगवेगळी कारणं देऊन आपण बाजूला व्हायचं. तोडता येत नाहीत म्हणून ‘द्राक्षेच आंबट आहेत’ असं म्हणणार्‍या कोल्ह्यासारखं! जे काही झालं त्यात माझा काही दोष नव्हताच हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करायचा. मी योग्य होतो पण परिस्थितीने दगा दिला असं भासवत रहायचं. आपण कमी पडलो किंवा आपले प्रयत्न कमी पडले हे कोणी मान्यच करत नाही.
नशीब ही अशीच एक खूप छान कल्पना आहे. म्हणजे काहीही झालं नाही तर सरळ नशिबावर ढकलून द्यायचं बस्स! माझ्या नशिबात ते नव्हतं, असं म्हटलं की सर्व माफ! एखादा अभ्यास न करणारा विद्यार्थी जर, पास होणं माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणत असेल तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे अभ्यास करणं, प्रयत्न करणं, त्यासाठी कष्ट घेणं ही गोष्ट त्याच्या हातात होती. मात्र नशिब नावाचा जॅकपॉट हातात असताना दोष आपल्यावर का घ्यायचा, नाही का?
‘जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा कारणं द्यायची गरज नसते आणि जेव्हा तुम्ही हारता तेव्हा कारणं द्यायचा काही फायदा नसतो’, असं काहीसं ऍडॉल्फ हिटलरचं एक छान वाक्य आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हारता त्यावेळी तुम्ही कितीही आणि काहीही कारणं दिली तरी तो निकाल बदलणार नसतो. तेव्हा स्वत:च्या चुका मान्य करून पुन्हा उभं राहण्यात खरी मजा असते.
‘पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे’, असंही वाचलं होतं. पण या विचारांचा लोक गंभीरपणे विचार करतात का? माझा एक मित्र आहे. तो ‘मोटिव्हेशन’चे सेमीनार घ्यायचा. नोकरी सोडून त्याने जिद्दीने हे सेमीनार घ्यायला सुरूवात केली होती; पण काही दिवसांनंतर ज्यावेळी मला तो भेटला त्यावेळी तो स्वत: खूप ‘डिमोटिव्हेट’ झाला होता. त्याने पुन्हा नोकरी पत्करली होती. सलग काही सेमीनार अयशस्वी झाल्यामुळे, त्यांचे आर्थिक गणित जुळवता न आल्यामुळे त्याने कच खाल्ली. त्याच्याकडे पात्रता होती पण त्यासाठी लागणारे धाडस तो गमावून बसला होता.
आपल्यातील बहुतेकांची अवस्था ही शक्तींचं विस्मरण झालेल्या हनुमानासारखी झालेली असते. अचाट शक्ती असूनही त्याचं विस्मरण झाल्यामुळे तो काही करू शकत नसतो. त्याप्रमाणेच आपल्यात अनेक गुण असतात पण आपण त्यांना वावच देत नाही. बरेच लोक संधी येईल याची वाट बघण्यात आयुष्य घालवतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, ‘‘वाट पाहणार्‍यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.’’
आपल्या देशात काय नाही? आपल्या देशाएवढी समृद्धता, बुद्धिमत्ता असलेला दुसरा देश अपवादात्मकच असेल. पण तरीही आपण महासत्ता होण्यापासून खूप दूर आहोत कारण आपल्या देशातील बुद्धिमत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्याला जमत नाहिये आणि याचा फायदा दुसरे देश घेतायत. आम्हाला जर काही जमत असेल तर ते फक्त राजकारण आणि त्यातून भ्रष्टाचार हेच! स्वत: रस्त्यावर कचरा फेकणार्‍यांनी देशाच्या स्वच्छतेबद्दल गप्पा काय माराव्यात आणि स्वत:चं घर नीट न सांभाळणार्‍याने देशाच्या व्यवस्थेबद्दल काय बोलावं? सगळंच धन्य आहे!
इथं माझ्या आणखी एका मित्राचं उदाहरण सांगावंसं वाटतं. नोकरीतील अस्थिरता आणि पैसे मिळत नसल्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. खूप मोठी स्वप्नं बाळगणारा तो ‘डिप्रेशन’मध्ये जाण्याच्या मार्गावर होता. खूप नकारात्मक वातावरण तो आपल्या भोवती तयार करू लागला होता. त्याच्याशी सारख्या केलेल्या गप्पा व त्याला तो कसा आहे हे सारखं आठवण करून दिल्यामुळं तो विचार करत राहिला. त्याला काहीतरी व्यवसाय करायचा होता पण काय करावा? कसा करावा? हे त्याला कळत नव्हतं. तो सारखा म्हणायचा की ‘एक पर्याय हवाय?’ पण असे कितीतरी पर्याय त्याच्या आसपासच होते हे त्याला खूप उशीरा कळलं. तो नकारात्मकतेतून बाहेर पडून सकारात्मकतेकडे वळला आणि एक दिवशी त्याचा फोन आला की, ‘मला एक खूप चांगला व सोपा व्यवसायाचा पर्याय सापडला आहे. आपण खूप वेळा त्याच्यावर चर्चा केली पण गंभीरपणे त्याच्यावर विचारच केला नाही.’  तो ज्या पर्यायांवर बोलायचा त्यापैकीच एक व्यवसाय त्याला ‘क्लिक’ झाला आणि त्याचे त्याने नियोजन केले. आता त्याचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू आहे. 
‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जर आपण आपल्या भोवती सकारात्मक वलय तयार केले तर कोणतीच अडचण, समस्या उद्भवत नाही. ती सकारात्मकता त्यातून तुम्हाला बाहेर काढते याउलट जर तुम्ही नकारात्मक विचारात गुरफटत राहिलात तर ती समस्या जास्तच वाढत जाते. कुणीतरी ‘यू कॅन डू इट’ म्हणणारं असलं की जरा जोर जास्त लागतो.
आज सगळे लोक कशाच्या मागे धावतायत. तर पैशाच्या! पैसा मिळवणं खूप अवघड आहे का? तर मुळीच नाही. तुमच्याकडील साधनांद्वारे, तुम्हाला मिळणार्‍या पैशाला कामाला लावून तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. इथंही तुम्हाला स्वत:ला बदलावं लागतं, स्वत:चे विचार बदलावे लागतात, बस्स! ‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ती तुमची चुक आहे’, असे एक विचारवंत म्हणतात. पण देवानं दिलेलं डोकं वापरायचंच नाही असंच आम्ही ठरवलंय! आणि फक्त रडायचं!
तुम्हाला जर काही बदल हवा असेल तर प्रथम स्वत:त बदल करायला हवा. हा साधा नियम आहे; पण आम्ही जग बदलायला निघतो स्वत:कडे लक्ष न देता. काय करणार? ‘परी तू जागा चुकलासी!’ साधच उदाहरण घ्यायचं झालं तर लग्न झालेली मुलगा किंवा मुलगी जोडीदारात आपल्या स्वप्नातील ‘तो/ती’ शोधण्याचा प्रयत्न करतात पण स्वत: तसे होण्याचा अजिबात विचार करत नाहीत. का? माहीत नाही.
मला वाटतं असंच आपल्या आयुष्याची जागा चुकण्याआधी आपण स्वत:मध्ये शोधुया. नक्की काहीतरी सापडेल जे तुमचं तुमच्यापुरतं तरी जग बदलून टाकेल.

- तुषार उथळे पाटील
9552858100